Ladki bahini Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १२ हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. आतापर्यंत पाच लाख साठ हजारांवर अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मंजूर झालेल्या भगिनींच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे.
तहसीलदार यांच्या देखरेखीखाली कार्यरत समितीने १२ हजार अर्ज मंजूर केले आहेत. कागदपत्रांची पूर्तता असलेल्या अर्जाची सध्या
छाननी सुरू आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित पात्र अर्ज मंजूर केले जात आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून ५ लाख ६० हजारांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण’ ही योजना आणली असून, योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन मिळणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून रोज नवा आदेश मिळत असल्याने प्रशासनात संभ्रम
निर्माण झाला होता. मागच्या आठवड्यात आलेल्या नवीन आदेशात तालुका पातळीवर तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती.
यासोबत वॉर्ड समितीदेखील कार्यरत राहणार असून, या समितीत राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवार, २६ जुलै रोजी राज्य शासनाने पुन्हा एक नवा आदेश काढून विधानसभानिहाय समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.